हैदराबाद, 24 एप्रिल : भारतीय क्रीडा विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादचा फास्ट बॉलर अश्विन यादव (Ashwin Yadav) याचं शनिवारी हृदयविकारामुळे निधन झालं आहे, तो 33 वर्षांचा होता. अश्विन यादवला पत्नी आणि तीन मुलं आहेत. 2007 साली अश्विनने मोहालीत रणजी ट्रॉफी सामन्यातून पदार्पण केलं होतं. हैदराबादसाठी त्याने 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 34 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 10 लिस्ट ए मॅच खेळल्या, ज्यात त्याला 4 विकेट मिळाल्या. दिल्लीविरुद्ध 2008-09 मध्ये त्याने 52 रन देऊन 6 विकेट घेतल्या, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
अश्विनने 2009 साली मुंबईविरुद्ध शेवटची रणजी ट्रॉफी मॅच खेळली. यानंतर तो स्टेट बँक ऑफ हैदराबादसाठी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळायचा.
अश्विन यादवच्या मृत्यूनंतर भारतीय टीमचे बॉलिंग प्रशिक्षक आर.श्रीधर (R Sridhar) यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. 'अश्विन यादवच्या निधनाची बातमी ऐकून मी गळून पडलो आहे. तो नेहमी आयुष्य जगायचा आणि कायम टीमसाठी खेळायचा. अश्विन शानदार फास्ट बॉलर होता. त्याच्या कुटुंबाला हे दु:ख पचवण्याची शक्ती मिळो, ही इश्वर चरणी प्रार्थना. तुझी कायमच आठवण येईल,' असं ट्वीट श्रीधर यांनी केलं.
Devastated to hear the news of #Ashwinyadav passing away. A Very jovial and fun loving guy, team man to the core, punched way above his skills as a fast bowler. I pray to God for strength to his family. #gonetooearly #OmShanti
You will be missed. pic.twitter.com/0gIuOKZr6L
— R SRIDHAR (@coach_rsridhar) April 24, 2021
अश्विनसोबत खेळलेला ऑफ स्पिनर विशाल शर्मा यानेही त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. अश्विनच्या चेहऱ्यावर कायमच हसू असायचं, तो टीमसाठीच कायम खेळायचा. अश्विनचा मृत्यू झाला आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही, असं विशाल शर्मा म्हणाला.