पुणे, 2 डिसेंबर : पुणे शहरात कचरा कोंडीची समस्या जुनी आणि तीव्र आहे. विशेषतः कंटेनर पद्धत बंद केल्यानंतर रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण वाढलं आहे. कोथरुड भागात डीपी रस्त्यावर आशिष गार्डन जवळ वर्दळीच्या रस्त्यावर कचरा साचत असल्याने दुर्गंधी पसरत आहे.
कचऱ्यामुळे शहरात आरोग्य आणि वाहतुकीचीही समस्या जाणवत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत जिथं नागरिक कचरा टाकतात तिथं सुबक,सुरेख रांगोळी काढायला सुरुवात केली आहे.
आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छ पुणे सुंदर पुणे,ओला ,सुका कचरा वेगळा ठेवा,रस्त्यावर कचरा टाकू नका असा संदेश देण्यात आला आहे. इतकी सुंदर रांगोळी पाहिल्यावर कुणी कचरा टाकायला धजवणार नाही आणि रांगोळी पाहून लोकांमध्ये ओला ,सुका कचरा वेगळा करावा ,रस्त्यावर कचऱ्याचे ढीग करू नयेत,कचऱ्यावर प्रक्रिया करून खत बनवावं असं प्रबोधन होईल असा यामागचा हेतू आहे.
पुण्यात रोज शेकडो टन कचरा तयार होतो. बहुतांश कचरा उरुळी देवाची,फुरसुंगी भागात पाठवून त्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र तरीही क्षमता कमी असल्याने कचरा उरतोच आणि शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग बघायला मिळतात. वार्डात किंवा प्रभागातच कचऱ्याची विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. ओला ,सुका कचरा वेगळा केला नाही किंवा रस्त्यावर फेकला,जाळला तर दंडही आहे. मात्र कचरा कोंडी कायमच आहे. प्रबोधन केलं तरच हळू हळू का होईना जागरूकता वाढेल असं स्वच्छता कर्मचाऱ्यांना वाटतं.