भोपाळ, 25 एप्रिल : संपूर्ण देशाला सध्या कोविड-19 च्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने हादरवून टाकलं आहे. रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणेसमोर अनेक आव्हानं निर्माण झाली असून, ऑक्सिजन तुटवड्याच्या संकटाने परिस्थिती आणखीनच बिकट केली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणेवरही ताण वाढला आहे. पुरेशा आरोग्य यंत्रणा उभारणं, आवश्यक औषधं, उपकरणं यांचा पुरवठा सुरळीत ठेवणं, कडक निर्बंधाचं पालन होतेय की नाही याची दक्षता घेणं अशा अनेक पातळ्यांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करावं लागत आहे.
या स्थितीतही कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देणारे अनेक अधिकारी घरदार विसरून लोकांच्या सेवेसाठी जीवाचं रान करत आहेत. असे अधिकारी समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवत आहेत. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अतिरिक्त जिल्हाधिकारी अर्पित वर्मा (Arpit Varma) यांनीही आपल्या कर्तव्यनिष्ठेने एक आदर्श निर्माण केला आहे. समर्पित भावनेनं काम करणाऱ्या वर्मा यांनी आपलं अर्पित हे नाव सार्थ केलं आहे.
प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीतही शहाडोल विभागात (Shahdol Division) नियुक्ती झालेले आयएएस अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (Medical College) प्रभारी प्रमुख असलेले अर्पित वर्मा यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं आहे. अर्पित वर्मा यांची पत्नी शहाडोल इथल्या रूग्णालयात कोविड-19 वरील उपचार घेत असून, अवघ्या अडीच वर्षांच्या मुलाची सगळी जबाबदारी वर्मा यांच्यावर आहे.
वर्मा यांचे आई-वडील आणि भाऊही कोविड-19 नं आजारी असून, ते लखनौमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची आई फुफ्फुसात 40 टक्के संसर्ग असल्यानं आयसीयूमध्ये आहे. अशा परिस्थितीतही अर्पित वर्मा शहाडोलसारख्या दुर्गम भागात प्रशासकीय जबाबदाऱ्यांसह वैद्यकीय महाविद्यालयाच्या देखरेखीचीही जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत.
शहाडोल विभागातील या वैद्यकीय महाविद्यालयामार्फत आजूबाजूच्या किमान सहा जिल्ह्यांतील वैद्यकीय गरजांची पूर्तता केली जाते. वर्मा यांच्यावर त्यांच्या अखत्यारितील संपूर्ण परिसरामधील कोविड-19 ची स्थिती हाताळण्याची जबाबदारी आहे. घरातील लोकांची काळजी घेण्याबरोबरच ते या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या कोविड-19 रुग्णांना आवश्यक ते सर्व उपचार मिळावेत, काहीही कमतरता भासू नये यासाठी सतत परिस्थितीवर लक्ष देत आहेत.
‘इथं असणारे रुग्ण देखील कोणाचे तरी जिवलग आहेत, त्यांच्या कुटुंबाचा आधार आहेत, म्हणूनच मी त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करत आहे,’ असं त्यांनी सांगितलं.
2015 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेल्या वर्मा यांनी आयआयटी रुरकी आणि आयआयएम कोलकाता येथून शिक्षण घेतलं आहे, तरीही त्यांनी प्रशासकीय सेवेत कारकीर्द करण्याला प्राधान्य दिलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनीही अर्पित वर्मा यांची दखल घेतली असून, गुरुवारी ट्विटवर त्यांनी वर्मा यांच्या सेवानिष्ठतेचं, समर्पित वृत्तीचं कौतुक केलं आहे.