नोएडा, 03 डिसेंबर : एनसीआरमध्ये असलेल्या एका मोठ्या रिअल इस्टेट ग्रुपने तीन हजार कोटींपेक्षा अधिक बेहिशोबी संपत्ती असल्याचं मान्य केलं आहे. सीबीडीटी (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स)ने सोमवारी सांगितले की, आयकर विभागाच्या छाप्यावेळी ही बाब समोर आली. मात्र, सीबीडीटीने संबंधित रिअल इस्टेट ग्रुपचे नाव उघड करण्यास नकार दिला.
सीबीडीटीने नाव सांगितलं नसलं तरी, याबाबत अधिकृत सूत्रांनी दावा केला आहे की ओरिएंटल इंडिया ग्रुपने बेहिशोबी संपत्ती असल्याचं मान्य केलं आहे. अधिकृतपणे जाहीर कऱण्यात आलं आहे की, गेल्या आठवड्यात 25 ठिकाणी छापा मारण्यात आला होता. हा ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर, मायनिंग आणि रिअल इस्टेटमध्ये सक्रीय आहे.
रिअल इस्टेट ग्रुपकडे 250 कोटी रुपये इतकी रक्कम रोख स्वरुपात असल्याची माहिती मिळाली आहे. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच या ग्रुपने अनेक प्रॉपर्टीच्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्सही भरलेला नाही. जवळपास 3.75 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ताही जप्त केली आहे. ग्रुपने 3 हजार कोटींचा काळा पैसा असल्याचं मान्य केलं आहे. तसेच त्यावर टॅक्स देण्याची तयारी दर्शवली आहे. छाप्यानंतर संबंधित ग्रुपची 32 बँक लॉकर सील करण्यात आली आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा