KB Hedgewar Birthday: RSS च्या संस्थापकांनी केला होता काँग्रेसप्रवेश मग का घेतली फारकत?

KB Hedgewar Birthday: RSS च्या संस्थापकांनी केला होता काँग्रेसप्रवेश मग का घेतली फारकत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS founder KB Hedgewar) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा 1 एप्रिल हा जन्मदिवस. काँग्रेसमध्ये सामील झालेल्या हेडगेवारांना वेगळ्या संघटनेची स्थापना का करावीशी वाटली?

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल:| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh - RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr. K. B. Hedgewar) यांचा एक एप्रिल 1889 हा जन्मदिन. स्वातंत्र्यपूर्व काळात 'वंदे मातरम्' गीत गायल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता आणि सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. नंतरच्या काळात त्यांचा काँग्रेसमध्ये भ्रमनिरास झाला. त्यानंतर त्यांनी 1925 साली नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

एक एप्रिल 1889 रोजी डॉ. हेडगेवार यांचा जन्म नागपुरात (Nagpur) एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचं प्रारंभिक शिक्षण नागपूरच्या नील सिटी हायस्कूलमध्ये झालं. तत्कालीन ब्रिटिश सरकारने सर्क्युलर काढून शाळेत वंदे मातरम् हे गीत गाण्यास बंदी घातली होती. पण लहान केशवने वंदे मातरम् गीत म्हटलं. त्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना शिक्षणासाठी आधी यवतमाळ आणि नंतर पुण्याला पाठवलं. मॅट्रिक झाल्यानंतर हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. एस. मुंजे (B. S. Munje) यांनी त्यांना वैद्यकीय पदवीच्या अभ्यासासाठी कोलकात्याला पाठवलं.

डॉ. हेडगेवार जेव्हा कोलकात्यात वैद्यकीय शाखेचं शिक्षण घेत होते, तेव्हा ते अनुशीलन समिती या देशातल्या तेव्हाच्या नामवंत क्रांतिकारी संस्थेशी जोडले गेले. 1915मध्ये ते नागपुरात परत आले आणि नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये काम सुरू केलं. काही काळासाठी त्यांनी काँग्रेसचे विदर्भ प्रांताचे सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली. अर्थात, याच काळात ते हिंदू महासभेतही सक्रिय होते.

1920मध्ये जेव्हा नागपुरात काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं, तेव्हा त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याचं उद्दिष्ट ठेवण्यासंदर्भातला प्रस्ताव काँग्रेसमध्ये पहिल्यांदा मांडला होता. तो तेव्हा पारित झाला नव्हता. 1921मध्ये काँग्रेसने पुकारलेल्या असहकार चळवळीतही ते सत्याग्रही म्हणून सहभागी झाले होते. त्या वेळी त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला होता.

त्यानंतर भारतात सुरू झालेल्या धार्मिक-राजकीय खिलाफत चळवळीमुळे काँग्रेससोबत काम करणं त्यांना पटेनासं झालं. 1923मध्ये झालेल्या सांप्रदायिक दंग्यांमध्ये त्यांची वाटचाल पूर्णत्वाने हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाली.

हे वाचा-  खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर, भाजपनं दिली माहिती; उपचार सुरू

हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. एस. मुंजे यांच्याशी ते पहिल्यापासूनच संपर्कात होते. त्यांच्याशिवाय हेडगेवार यांच्या व्यक्तिमत्त्वावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantryaveer Sawarkar) यांचा मोठा प्रभाव होता.

आपल्या मनात असलेली हिंदू राष्ट्राची संकल्पना साकार करण्यासाठी 1925मध्ये डॉ. हेडगेवार यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. संघाचे ते पहिले सरसंघचालक होते. त्यांनी संघाला सुरुवातीपासूनच सक्रिय राजकारणापासून दूर ठेवलं आणि सामाजिक व धार्मिक कार्यांमध्येच सहभाग राखला.

हे वाचा- रजनीकांत यांना मिळालेल्या फाळके पुरस्काराबाबतच्या एका प्रश्नानं जावडेकर भडकले

हिंदूंना एका धाग्यात बांधून एक शक्तिशाली संघटना म्हणून विकसित करणं हे संघाचं प्राथमिक काम आहे, असं डॉ. हेडगेवार म्हणायचे. देशप्रेमाने भरलेली व्यक्ती घडवण्यासाठी रोज संस्कार व्हायला हवा म्हणून त्यांनी संघाची शाखा सुरू केली. लहानपणी संस्कारक्षम वय असल्याने त्याच वयातील मुलांवर खेळांच्या माध्यमातून संस्कार करण्याची कार्यपद्धती म्हणजे संघाची शाखा.

हे वाचा - शरद पवारांच्या नावाने ओळखली जाणार 'सह्याद्री'तील वनस्पती, Argyreia Sharadchandra

डॉ. हेडगेवार यांचं निधन 21 जून 1940 रोजी नागपुरातच झालं. त्यांच्यानंतर माधवराव सदाशिवराव गोळवलकर तथा गोळवलकर गुरुजी (Golwalkar Guruji) यांच्याकडे सरसंघचालकपदाची जबाबदारी आली.

First published: April 1, 2021, 6:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या