मुंबई, 2 डिसेंबर : मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर साधारणपणे लोकल कधी येणार, कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार, संरक्षणात्मक उपाय, त्याचबरोबर भुरटे चोर यांच्यापासून सावध राहण्याच्या सूचना आपण नेहमीच ऐकत आहेत. परंतु गेले काही दिवस मात्र स्थानकांवर नव्या सूचना ऐकू येऊ लागल्या आहेत.
नव्या सूचनांमध्ये मेकअप किट नको सेफ्टी किट वापरा, लिपस्टिक नको मास्क वापरा, परफ्यूम नको टायझर लावा, अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या जात आहेत. या सूचना अखिल भारतीय रेल्वे महिला प्रवासी संघटना यांच्या वतीने केल्या जात आहे. या संघटनेचे अध्यक्ष वंदनाताई गायकवाड या स्वतः हातात माईक घेऊन अशा स्वरूपाच्या सूचना महिलांना करताना दिसत आहेत.
कोरोनाचा प्रसार गेले काही दिवस पुन्हा वाढताना दिसू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी वंदनाताई गायकवाड या वेगवेगळ्या स्थानकांवर अशा प्रकारच्या सूचना करताना दिसत आहेत. आतापर्यंत कल्याण,डोंबिवली, सीएसटी स्थानकावर त्यांनी प्रत्यक्ष बसून महिलांना अशा पद्धतीने जागृत केले आहे.
त्यांच्या संघटनेच्या इतर पदाधिकारीही अशा स्वरूपाच्या सूचना येत्या काळात रेल्वे स्थानकांवरून करताना दिसतील. एका महिलेने दुसऱ्या महिलेला आवाहन केल्यास त्याचा परिणाम जास्त होत असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या ध्यानात आले आहे. त्यामुळेच अशा जनजागृती करणाऱ्या मोहिमेला पाठिंबा वाढताना दिसत आहे. येत्या काळात रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली तर आपल्या संघटनेच्या पदाधिकारी इतर स्थानकांवरही अशा पद्धतीच्या सूचना द्यायला तयार आहेत, अशी भावना वंदनाताई गायकवाड यांनी व्यक्त केलेली आहे.