Explained: ऑस्ट्रेलियात एकाएकी वाढतेय उंदरांची दहशत, लाखोंच्या नुकसानाबरोबरच पँडेमिकची भीती

Explained: ऑस्ट्रेलियात एकाएकी वाढतेय उंदरांची दहशत, लाखोंच्या नुकसानाबरोबरच पँडेमिकची भीती

Rat Plague in Australia: संपूर्ण जग कोरोनाशी लढा देतंय. पण ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाबरोबरच इतरही काही भयावह संकटं धडकली आहेत. यातील एक समस्या आहे ती म्हणजे वाढत्या उंदरांची आणि त्याबरोबर वाढणाऱ्या आजारांची...

  • Share this:

मेलबर्न, 25 मार्च: ऑस्ट्रेलियावर (Australia) एकामागून एक संकटं येत आहेत. कोरोनाचा (Corona) परिणाम झालेला असताना त्याच दरम्यान जंगलांना भीषण आग लागल्याने देश हादरुन गेला. आता उंदरांच्या (Rat) वाढत्या संख्येमुळं एक नवं संकट निर्माण होताना दिसत आहे. देशात अचानक उंदरांची संख्या वाढल्यानं स्थानिक दुकानदार तसेच नागरिक दिवसभर उंदिर पकडण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे. उंदरांच्या वाढत्या संख्येमुळे प्लेगची (plague) साथ पसरणार तर नाही ना अशी शंका आता व्यक्त होत आहे.

जागोजागी झालेत उंदीर

न्यू साऊथ वेल्स आणि क्विन्सलॅंड सारख्या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं उंदीर आढळून येत आहेत. या उंदरांचा वावर शेती, मोकळ्या जागा किंवा टाकाऊ वस्तुंच्या ठिकाणांपर्यंत मर्यादित राहिला नसून घरे, खाद्य पदार्थ, रुग्णालयं तसंच खासगी आणि सार्वजनिक वाहनांमध्येही आहे. याठिकाणचे नागरिक सोशल मिडीयावर (Social Media) घरात कुठे कुठे उंदीर आहेत, कुटुंबातील सदस्य सातत्याने कसे उंदीर पकडत आहेत, याचे व्हिडीओ अपलोड करत आहेत.

...तेव्हा पहिल्यांदा घाबरले होते नागरिक

ही ऑस्ट्रेलियातील सद्यस्थिती असली तरी या देशात उंदरांनी एवढा धुमाकूळ का घातला आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मात्र हे समजून घेण्यासाठी जरा इतिहासही डोकावलं पाहिजे. ऑस्ट्रेलियात यापूर्वी उंदरांची एवढी संख्या कधीच नव्हती. मात्र 1787 मध्ये ही संख्या वाढल्याचं प्रथम दिसून आलं. याचा शोध घेतला असता, ब्रिटनशी (Britain) व्यापार करताना जहाजातून हे उंदीर ऑस्ट्रेलियात पोहोचले होते.

(हे वाचा-तरुणांना कोरोना लस का दिली जात नाही? तज्ज्ञांनी सांगितलं कारण)

उंदीरही चीनची देणगी

विशेष म्हणजे जगातील सर्व देशांमध्ये उंदरांचा प्रसार हा चीनमधून (China) झाला, असं मानलं जातं. त्यातही युरोपीय देशांमधील उंदरांचे वास्तव्य ही चीनची देणगी आहे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी चीनमुळे दुसऱ्या देशांमध्ये एका विशिष्ट प्रकारचा प्लेग पसरू लागला. व्यापारासाठी जा-ये करणाऱ्या जहाजांमुळे हा आजार पसरला. याचा पुरावा 1347 मध्ये मिळाला. जेव्हा इटलीमध्ये (Italy) चीनमधून आलेल्या 12 जहाजांमधून उंदीरही आले. त्यानंतर संपूर्ण इटलीत प्लेगचा प्रसार झाला. त्यानंतरच्या 5 वर्षात या जहाजांमधून आलेल्या आजारी उंदरांमुळे 20 दशलक्षपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या जहाजांना डेथ शिप (Death Ship) असं संबोधलं जाऊ लागलं. मात्र त्यानंतरही चीन सोबत व्यवहार सुरूच राहिला होता.

1993 मध्ये झालं होतं अन्नधान्याचं मोठं नुकसान

ब्रिटनच्या पोर्टमाऊथवरुन 1787 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जहाजं दाखल झाली. या जहाजांवर उंदीरदेखील होते. त्यानंतर सुमारे 4 वर्षे येथे उंदरांनी धुमाकूळ घातला. विशेषतः पिके परिपक्व होताना तसेच त्यांच्या साठवणुकीवेळी उंदरांची संख्या लक्षणीय वाढत होती. तसं पाहिलं तर प्रत्येक हंगामात उंदीर अन्नधान्यांच्या गोदामांवर हल्ला चढवतात. परंतु, त्यातही सर्वात मोठं नुकसान हे 1993 मध्ये झालं होतं. तेव्हा ऑस्ट्रेलियातील विविध प्रांतांमध्ये 96 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या अन्नधान्याचं नुकसान उंदरांमुळं झालं होतं.

(हे वाचा-कोरोना लशीचा बूस्टर शॉट काय असतो आणि तो का घ्यायलाच हवा?)

जनावरे आणि कारखान्यांवरही हल्ला

केवळ अन्नधान्याचं नुकसान नाही तर येथील उंदीर कोंबड्या आणि गायी-म्हशींवर देखील हल्ला करतात आणि त्यांच्या आजारपणास कारणीभूत ठरतात. त्यामुळं जनावरांमध्ये उंदरांमुळे आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी जनावरांना मारुन टाकावं लागतं. 1993 मध्ये उंदरांनी मोठं नुकसान केलं होतं. उंदरांच्या झुंडीच्या झुंडी रबर आणि इलेक्ट्रीक कारखान्यांमध्ये घुसल्या आणि त्यांनी मोठं नुकसान केलं. चारचाकी वाहनं आणि इमारतींना देखील नुकसानीची झळ बसली. त्यावेळी झालेल्या उंदरांच्या हल्ल्याचं कारण आणि नुकसान याचा ताळमेळ आजही ऑस्ट्रेलियन सरकारला लावता आलेला नाही.

2020 पासून वाढू लागली संख्या

सद्यस्थिती पाहता, ऑस्ट्रेलियामध्ये मागील वर्षातील मध्यापासूनच उंदरांची संख्या वाढू लागली. हा पिकांचा हंगाम होता. प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळी देखील उंदरांना रोखण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या परंतु त्यासर्व निरपयोगी ठरल्या. 2020 पासून उंदरांची संख्या वाढत असून सध्या दिवसेंदिवस त्यात मोठी वाढ दिसून येत आहे.

महामारी पसरण्याचा धोका

लोकांना आता केवळ अन्नधान्य आणि अन्य गोष्टींच्या नुकसानीची काळजी नाही तर या उंदरांमुळे महामारी (Pandemic) तर पसरणार नाही ना याची भिती वाटत आहे. सध्या सारं जग कोरोनामुळे त्रस्त झाले आहे. तशातच उंदरांमुळं प्लेगचाही प्रसार वाढू शकतो. गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियातील काही भागातील पाण्याच्या टाक्यांमध्ये मेलेले उंदीर आढळून आले आहेत. त्यामुळे प्लेग प्रसाराची शंका नागरिकांना वाटते.

प्लेग म्हणजे ब्लॅक डेथ

प्लेग ही जगातील सर्वात जुनी महामारी आहे. त्याला पेस्ट, टाऊन किंवा ब्लॅक डेथ (Black Death) असं संबोधलं जातं. हा आजार प्रामुख्यानं उंदरांमुळं पसरतो. आजारी उंदीर जर अन्न किंवा अन्य कोणत्याही वस्तुच्या संपर्कात आला आणि ती वस्तू माणसाच्या संपर्कात आली तर हा आजार होतो. पास्टरेला पेस्टीस नावाचा हा बॅक्टेरियोल़ॉजिकल रोग वेगाने पसरतो आणि तो प्राणघातकही ठरु शकतो. पुर्वीच्या काळी प्लेगचा प्रसार होताच लाखो लोक मृत्यूमुखी पडत. चांगले आरोग्य असलेल्या लोकांना स्थानांतरण करावे लागे. आता या रोगावर इलाज आला असला तरी प्लेग हा महाभयंकरच मानला जातो.

First published: March 26, 2021, 8:47 AM IST
Tags: australia

ताज्या बातम्या